मुंबई : ड्रग्ज तस्करीचा (drug trafficking) अनोखा प्रकार मुंबई विमानतळावर उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. युकेमधून कुरियरद्वारे पाठवण्यात आलेल्या मिठाई आणि बिस्कीटाच्या डब्यात गांजा सापडला (Cannabis found in sweets box) असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने सापळा रचून एका आरोपीला अटक (Cannabis smuggler arrested) केली. मुनाफभाई सय्यद (२५) असे अटक (Cannabis seized at Mumbai Airport) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिठाई आणि बिस्किटाच्या डब्यातून आलेला २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
मिठाईच्या डब्यात गांजा :यूकेमधून पाठविण्यात आलेल्या कुरियरमध्ये अंमली पदार्थ (ड्रग्ज) असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई विमानतळावरील कार्गो टर्मिनसवरवर तपासणी करण्यात आली. त्यावेळी यूकेहून आलेल्या कुरिअरमधील मिठाई आणि बिस्कीटाच्या डब्याची तपासणी करण्यात आली. त्यात २५० ग्रॅम गांजा सापडला. त्यानंतर एकाच खळबळ माजली होती.
आरोपीला शिताफीने अटक :कायदेशीर कारवाई करून ड्रग्ज जप्त करण्यात आला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १२ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. गुजरातमधील नवसारी येथे राहणाऱ्या सोहेल शकील खान याच्या नावाने हे कुरियर पाठविण्यात आले होते. त्यामुळे याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन ५ डिसेंबर रोजी नवसारी येथील वितरण केंद्रातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत कुरियरवरील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. पत्ता अपूर्ण असल्याने कुरियर घेण्यासाठी संबंधिताला केंद्रावर येण्याची विनंती करण्यात आली. आरोपी कुरियर घेण्यासाठी ७ डिसेंबर रोजी वितरण केंद्रावर आला. त्यावेळी सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.
बनावट केवायसीचा आधार :आरोपीने मित्र सोहेल शकील खानचे नाव कुरियरवर दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. बनावट केवायसीच्या माध्यमातून आरोपीने हा प्रकार केल्याचे सांगितले. त्यासाठी आरोपीने बनावट आधार कार्डचा उपयोग केला. या संपूर्ण मालाची खरेदी क्रेडिट कार्ड आणि अंगडिया व्यावसायिकाच्या मदतीने करण्यात आली होती. युकेमधील इस्माईल हजरत याने ब्रॅडफोर्ड येथून गांजा पाठवल्याचे चौकशीत उघड झाले आहे. आरोपी सय्यद २०२१ पासून यूकेमधून गांजा मागवत होता. त्यात त्याचा एक साथीदारही सहभागी आहे. आरोपी हा गांजा वापीमधील एका व्यक्तीला देणार होता. मात्र, त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली. पुढील तपासात सीमाशुल्क विभागाचे अधिकारी इतर आरोपींचा शोध घेणार आहेत.