मुंबई- हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. राज्यात अनेक ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला. मुंबईच्या चेंबूर - ट्रॉम्बे परिसरातील विविध संघटनानी एकत्र येत या प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे.
सातारा- जिल्ह्यातील कराडमधील विद्यानगर परिसरातही महिला आणि युवतींनी कँडल मार्च काढून या घटनेचा तीव्र निषेध केला. आरोपींना फाशी देऊन पीडितेला न्याय देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. विद्यानगरमधील कृष्णा कॅनॉल ते बनवडी दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला.
नंदुरबार- तळोदा येथे काँग्रेस कमिटीच्यावतीने कँडल मार्च काढण्यात आला. रोपींवर खटला चालवण्याऐवजी त्यांना भर चौकात फाशी देणयाची मागणी यावेळी करण्यात आली. याचसोबत महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करून देशातील कायदे व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली गेली.
कोल्हापूर- या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला. भारतात अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी कडक कायदा नाही, याचे खूप वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया यात सहभागी झालेल्या काही विद्यार्थिनींनी दिली. तर, लवकरात लवकर कडक कायदा काढून नराधमांना शिक्षा द्यावी, अशी मागणीही काही विद्यार्थ्यांनी यावेळी केली.
राज्यात अनेक ठिकाणी 'कँडल मार्च' पुणे- क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मभूमीत महाविद्यालयीन आणि शालेय तरुण-तरुणींनी एकत्र येत कँडल मार्च काढला. मुलींवर होणारे अत्याचार कधी थांबणार? असा सवाल यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. यासोबतच हैदराबाद प्रकरणाचा निषेध यावेळी केला गेला.