- अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी कर्जत-जामखेडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी यापूर्वीच शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला होता. यावेळी बोलताना शिंदे यांनी 'आज जमलेली गर्दी पाहता कर्जत-जामखेडचा गड आपण तिसऱ्यांदा सर करू', असा विश्वास व्यक्त केला आहे.
- श्रीरामपूर विधान सभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेच्यावतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थीत होते. कांबळेंनी लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती. त्यानंतर विखे कांबळेंच्या विरोधात असल्याची चर्चा होती. मात्र, आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने कांबळेंना शिवसेनेचे तिकीट मिळाले आहे. युती धर्म म्हणून कांबळेंचा उमेदवारी अर्ज भरताना विखेंनी उपस्थिती दर्शवत नाराजींच्या चर्चेला विराम दिला आहे
हेही वाचा -..या कारणांमुळेच खडसे, तावडे, मेहता, पुरोहीत यांचा पत्ता झाला कट ?
- नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिर्डी लोकसभेचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते.
- आपल्या वडिलांचे तिकीट कापून भाजपची उमेदवारी मिळवलेल्या राजेश पाडवी यांनी शहादा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शनही केले. शहादा मतदारसंघात राजेश पाडवी यांचे वडील उदेसिंग हे आमदार होते. ते देखील या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, उदेसिंग पाडवी हे एकनाथ खडसे यांचे समर्थक असल्यामुळे त्यांची उमेदवारी कापली गेली आणि त्यांच्या ऐवजी राजेश पाडवी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. उदेसिंग पाडवी यांच्या उमेदवारीवरून सुरुवातीला भाजपमध्ये दोन गट पडले होते. मात्र, सत्ताधारी पक्षाशी वाद नको म्हणून सर्वांनी राजेश पाडवी यांच्या उमेदवारीला समर्थन दर्शवल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा -काँग्रेसला उभारी देण्यासाठी खुद्द राहुल गांधीच मैदानात, रोड शो द्वारे करणार शक्तिप्रदर्शन
- बडनेरा विधानसभा मतदार संघातून युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या समर्थनाने त्यांनी आपला अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवी राणा सायकल रिक्षावर स्वार होऊन गेले होते.
- धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे चिरंजीव कुणाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तत्पूर्वी कुणाल पाटील यांनी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. या निवडणुकीतही मतदार मला विजयी करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाची जागा भाजपला गेल्यामुळे त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय स्थगित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.