मुंबई -अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर मागील भाजप सरकारच्या काळात झालेल्या राजकीय नियुक्त्या महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्या आहेत. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, अशासकीय सदस्य व विशेष निमंत्रित यांचा समावेश आहे. त्यानंतर राजकारण पेटले आहे. यावर मंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सरकारवर टिका केली आणि मराठा समाजाच्या मागण्यांसाठी लढतोय, त्यामळे नियुक्ती रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला.
मी राजकारणाचा बळी ठरलो-
मी राजकारणाचा बळी ठरलो आहे. मराठा आरक्षण प्रश्नी मी अशोक चव्हाण यांच्याबाबत भूमीका घेतली. ती कदाचित सरकारला रुचलेली नसेल, असे नरेंद्र पाटील म्हणाले. त्यामुळेच आकसापोटी ही नियुक्त रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला.
अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाचे नुकसान-
अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांच्यामुळे समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी कायम राहणार आहे. त्याठिकाणी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती लवकरात लवकर व्हावी असेही ते म्हणाले.
महामंडळावर चांगले काम केले
मी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी चांगलं काम करून देखील माझी नियुक्ती रद्द केली. अशोक चव्हाण यांना हटवा यासाठी मराठा समाजाचा सरकारवर दबाव आहे. तरी देखील मुख्यमंत्री त्यांना हटवत नाहीत. त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्री दबावाखाली काम करत असल्याचे पाटील म्हणाले.