मुंबई :जगातील सर्वांत मोठ्या पुनर्वसन प्रकल्पाची सर्वत्र चर्चा असतानाच आता धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडून काढून घेण्यात यावा. अदानी यांना दिलेले कंत्राट सरकारने ताबडतोब रद्द करावे, अशी मागणी धारावी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष राजू कोरडे यांनी केली आहे. आपण मागणी करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अदानी समूहाकडून विकास शक्य नाही :अदानी समूह सध्या प्रचंड आर्थिक दिवाळखोरीत आहे. शासनाने अदानी सोबत केलेल्या करारामध्ये अदानी समूहाला प्रतिवर्षी विलंब शुल्क केवळ दोन कोटी रुपये आकारण्यात आले आहे. जर एवढ्या मोठ्या प्रकल्पाचे विलंब शुल्क केवळ दोन कोटी रुपये दर वर्षाला असेल तर अदानी हा प्रकल्प 25 वर्षे सुद्धा रेंगाळू शकतो; कारण केवळ पन्नास कोटी विलंबशुल्कापोटी त्याला भरावे लागतील. त्यामुळे अदानी समूह सध्या हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या स्थितीत नसल्याने धारावी येथील जनता भरडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अदानी समूहाकडून धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाचे कंत्राट ताबडतोब रद्द करावे आणि नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, अशी लेखी विनंती आपण सरकारकडे करीत असल्याचे राजू कोरडे यांनी सांगितले.
काय आहे अदानीची अडचण ?
अदानी यांच्या कंपन्यांच्या समभागांच्या खरेदी विक्रीच्या प्रत्येक व्यवहारावर आता करडी नजर आहे. निर्बंध असणाऱ्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे असतील किंवा विकायचे असतील तर व्यवहार करणाऱ्या ट्रेडिंग अकाऊंटमध्ये व्यवहारासाठी आवश्यक असलेली 100 टक्के रक्कम जमा करणे बंधनकारक असते. त्यामुळे अदानी समूहाला कोणताही नवा प्रकल्प हाती घेताना पतपुरवठा मिळवणे अवघड होणार असल्याने धारावी प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता धारावीचा पुनर्विकास पुन्हा रखडण्याची शक्यता आहे. अदानी समूहाला धारावीच्या पुनर्विकासाचे कंत्राट देण्यात आले आहे.