मुंबई -केम्स कॉर्नर येथील उतारावरील मातीचा काही भाग कोसळला असून पाईपलाइन फुटल्याची घटना घडली. त्याची दुरुस्ती त्वरित करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पाण्याची पाईपलाइन दुरुस्त होईपर्यंत या विभागाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनीही या ठिकाणाला भेट दिली आहे.
केम्स कॉर्नर येथे दरड कोसळली, विभागात टँकरद्वारे केला जाणार पाणी पुरवठा - दरड कोसळली मुंबई
केम्स कॉर्नर येथे उतारावरील मातीचा काही भाग कोसळला असून, पाईपलाइन फुटल्याची घटना घडली. त्याची दुरुस्ती त्वरित करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पाण्याची पाईपलाइन दुरुस्त होईपर्यंत या विभागाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
मुंबईत काल मुसळधार पाऊस पडला. या पावसादरम्यान मुंबईतील सखल भागासह उच्चभ्रू वस्ती असलेल्या मंत्रालय, पेडर रोड, बाबूलनाथ आदी विभागातही पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे बाबुलनाथ जंक्शननजीक असणाऱ्या केम्स कॉर्नर परिसरातील उतारावरची माती खचली आहे. हा विभाग व्हीआयपी मानला जातो. येथून अनेक व्हीआयपी ये-जा करत असतात. यामुळे याची दखल पालिका आयुक्तांनी घेतली असून, त्यांनी या ठिकाणाला भेट दिली आहे.
या भेटीदरम्यान हँगिंग गार्डनमधील झाडे पडून पाईपलाइन फुटल्याचे निदर्शनास आले आहे. रस्ताही खचला आहे. उतारावरचे झाड पडल्याने माती रस्त्यावर आली आहे. रस्त्यावरील माती हटवून त्वरित रस्ता दुरुस्तीचे तसेच पडलेली झाडे हटविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. पाईपलाइन दुरुस्त होण्यासाठी काही वेळ लागणार असल्याने ५० टँकरद्वारे या विभागाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. ज्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता असेल त्याठिकाणी पाणी पुरवठा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनीही या घटनास्थळाला भेट दिली आहे. संरक्षक भिंतीवरच्या भागात चारशे ते तीनशे मिलिमीटर व्यासाच्या पाण्याच्या मोठ्या चार लाईन आहेत. त्यासोबतच दगडाचा पाया असलेली संपूर्ण दगडात बांधलेली ही संरक्षक भिंत होती. परंतु, डोंगरावरून काल धबधब्यासारखे कोसळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने ही संरक्षक भिंत खचल्याचे महापौरांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेने रात्रीच सर्व यंत्रणा कार्यान्वित करून वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली असून कामाला सुरुवात केल्याचे महापौरांनी सांगितले. सद्यस्थितीत दोन लेनचा रस्ता खचला गेला असून लगतच्या इमारतींना धोका पोहोचू नये, तसेच हे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी काही काळ हा मार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापौर म्हणाल्या.