मुंबई - ओबीसी आणि धनगर समाजाच्या मागण्यांबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसेच सरकार बरोबर सकारात्मक चर्चा झाल्याने ओबीसी समाजाने आयोजित केलेल्या १६ ऑक्टोबरचा चक्का जाम पुढे ढकलल्याची माहिती प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिली आहे.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास ओबीसींचा विरोध आहे. मराठा समाजाकडून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ओबीसी समाजही आक्रमक झाला. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी मागणी ओबीसी सामाजाची आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथी गृहावर बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर वडेट्टीवार बोलत होते. यावेळी बोलताना धनगर समाज आणि ओबीसी प्रश्नावर चर्चा सकारात्मक झाली. ओबीसी समाजाच्या मागणी संदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय झाल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.