मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कॅबिनेट मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. या बैठकीमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन वाढवण्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवांवरही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे.
लॉकडाऊन उठल्यानंतर राज्याची अर्थव्यवस्था देखील संकटात येणार आहे. त्यावर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी टास्क फोर्स गठीत करण्याची मागणी केली आहे. याबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे राज्य सरकार चिंतेत आहे.
सोमवारी राज्यात 120 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 868 झाली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यामध्ये पुरेशा प्रमाणात साधनसामुग्री उपलब्ध आहे. मात्र, आपत्कालिन स्थिती ओढावल्यास खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाकडे सव्वा तीन लाख पीपीई कीटस्, 9 लाख एन 95 मास्क आणि 99 लाख ट्रिपल लेअर मास्कची मागणी करण्यात आली आहे. हे साहित्य तातडीने मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
देशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून मुंबईत देखील वेगाने या व्हायरसने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाशी लढा देण्यासाठी येथील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याची नितांत आवश्यक असताना आता मुंबईतील एक मोठे रुग्णालय सील करण्यात आले आहे. मुंबईतलं वॉकहार्ट हे खासगी रुग्णालय विविध प्रकारच्या आजाराच्या रुग्णांना उपचार देत आहे. येथे ह्रदयरोगावर उपचार केले जातात. मात्र, या रुग्णालयातल्याच 3 डॉक्टर आणि तब्बल 26 नर्सेसला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून हे संपूर्ण रुग्णालयच सील करण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या आसपासचा भाग देखील कंटेनमेंट भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे.
एकंदरीतच कोरानाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील रोडावला आहे. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेऊन या संदर्भातील सर्वंकष धोरण जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.