मुंबई- राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या निवडी संदर्भातील प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव घेऊन मंजूर करण्यात आला. राज्यपालांकडे ही नावे सादर करण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.
महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी चार नावांचा प्रस्ताव असून त्यासाठी कोणतीही तक्रार येणार नाही, अशी खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती भुजबळ यांनी यावेळी दिली. आज मंजूर करण्यात आलेला प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच राज्यपालांना सादर करणार आहेत.
कोणा-कोणाला मिळणार विधानपरिषदेची आमदारकी?
१२ नावे राज्यपालांकडे सादर केली जाणार आहेत, त्यासंदर्भात कुठलीही माहिती महाविकास आघाडीतील मंत्र्यांकडून देण्यात आली नसली तरी अनेकांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये काँग्रेसकडून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री नसीम खान आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतून माजी राज्यमंत्री सचिन अहीर, मिलिंद नार्वेकर, सुनील शिंदे, शिवाजी आढळराव-पाटील यांची नावे चर्चेत आहेत. या सोबतच सेनेतून वरुण सरदेसाई यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा सेनेच्या गोटात सुरू आहे.
हेही वाचा -कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण
राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे, शेतकरी नेते राजू शेट्टी, आंबेडकरी कलावंत आनंद शिंदे आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावांची चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येते.