मुंबई - येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पार्किंगमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. येथील खासगी सुरक्षारक्षकांनी कॅब चालकाला बेदम मारहाण केली व शिवीगाळ देखील केली आहे. याप्रकरणाचा तपास केला असता, मुंबई पोलिसांनी सहा संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संशयित आरोपींना अटक - घडलेल्या सर्व प्रकारानंतर कॅब चालकाने थेट पोलीस स्टेशन गाठत याबद्दल तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हे दाखल करत त्यांना लगेच अटक केली आहे, याबाबतची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या सहा जणांवर आयपीसी कलम १४२, १४३, १४६, १४७, ३२३, ५०४अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. कॅब चालकाच्या तक्रारीवरून गणेश मोहिते, मोहन धोत्रे, किशोर, अनिल ठाकूर, सागर, फातिमा टुले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पार्किंगवरून वाद वाढला - मिळालेल्या माहितीनुसार, कॅब चालक देवन देवरे हा पार्किंगमध्ये प्रवाशांची वाट पाहत उभा होता, त्यावेळी एक खासगी महिला सुरक्षा कर्मचारी तिथे आली आणि कार पार्क करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. नंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर अनेक सुरक्षा कर्मचारी त्या ठिकाणी दाखल होऊन त्यांनीही या कॅब चालकाला शिवीगाळ करत दमदाटी देखील केल्याचे समजते.