मुंबई Sewri Nhava Sheva Atal Setu : ब्रिटिशांनी मुंबईचं महत्त्व ओळखलं आणि इथे व्यापाराच्या दृष्टीनं त्यांनी भाऊचा धक्का, गेटवे ऑफ इंडिया येथे बंदर बांधली. जी आजही अस्तित्वात आहेत. ब्रिटिश काळात या बंदरांवरती मोठमोठी मालवाहू जहाजे येत आणि लाखोंचा व्यवहार होत असे. त्या काळापासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, गोवा या भागात जाण्यासाठी पक्के रस्ते नव्हते. दळणवळणाची साधनं नव्हती. तेव्हा बोटीनं जाणं हा एकमेव पर्याय इथल्या चाकरमानांकडे होता. ब्रिटिशांनी सुरू केलेली ही जलवाहतूक सेवा आजही सुरू आहे आणि अनेक पर्यटकांचं आकर्षण आहे. मात्र, देशातील सर्वांत लांब अटल बिहारी वाजपेयी नावसेवा सागरी सेतूमुळे ही जलवाहतूक सेवा आता संकटात सापडली आहे. (Trans Harbor Sealink)
तर पर्यटक बोटसेवेकडे पाठ फिरवतील:आजही अलिबाग, एलिफंटा, गोवा या ठिकाणी फिरायला जाणारे हौशी पर्यटक रो रो बोट सेवा आणि फेरीबोट यासारख्या जलवाहतुकीचा पर्याय निवडतात. विस्तीर्ण अशा समुद्रातून आणि मोकळ्या अशा आकाशाखाली फिरणं ही पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरते. पर्यटक या समुद्री मार्गाचा पर्याय निवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे मागची कित्येक वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आणि या महामार्गात पडलेले मोठमोठे खड्डे. या सागरी मार्गामुळे पर्यटकांचा प्रवास कमी वेळेत, सुखकर आणि आनंदात होत होता. मात्र, आता सागरी सेतूमुळे पर्यटक आपल्या जलवाहतुकीकडे पाठ फिरवतील अशी भीती या फेरीबोट चालकांना आहे.
राज्य सरकारने द्यावी मदत:या फेरीबोट चालकांचं म्हणणं आहे की, ब्रिटिश काळापासून आम्ही मुंबईकरांना आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना सेवा देत आहोत. समुद्राच्या कुशीत वसलेली गावं आणि मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या शहरांना जोडण्याचं काम मागाच्या पिढ्यानपिढ्या आम्ही केलं आहे. पण न्हावाशेवा सागरी सेतूमुळे आता पर्यटकांचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे अनेक जण याच मार्गाने प्रवास करतील. आम्हाला भीती आहे त्याचा परिणाम आमच्या व्यवसायावर होईल. त्यामुळे इथून पुढे पर्यटकांनी या सागरी वाहतुकीकडे पाठ फिरवल्यास आम्ही घर कसं चालवायचं? हा आमच्या समोर मोठा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने आम्ही वर्षानुवर्ष दिलेल्या सेवेचा विचार करून आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी फेरीबोट चालक-मालक संघटनेकडून करण्यात आली आहे.