मुंबई -बसमधून प्रवास करणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीला नको तो प्रश्न विचारणाऱ्या एका कंडक्टरला मुंबईतील एका विशेष न्यायालयाने शिक्षा केली आहे. चंद्रकांत सुदाम कोळी, असे या कंडक्टरचे नाव आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीला या कंडक्टरने प्रवासादरम्यान सेक्सबद्दल माहिती आहे का, अशी विचारणा केली होती. बस कंडक्टर चंद्रकांत सुदाम कोळी याला पोक्सो कायद्यातंर्गत दोषी ठरवत एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच त्याला १५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
2018मध्ये घडली होती घटना -
ही घटना 2018 साली पूर्व उपनगरातील ही घटना आहे. तेरा वर्षाची मुलगी दररोज शाळेसाठी बसचा वापर करत होती. जुलै २०१८ रोजी मुलगी शाळेतून घरी निघाली होती. यावेळी बसमधून २ ते ३ लोकच प्रवास करत होते. यावेळी कंडक्टर चंद्रकांत कोळी तिच्याजवळ जाऊन बसला. त्यानंतर त्याने मुलीला ‘तुला सेक्सबद्दल माहिती आहे का?’, असा प्रश्न केला. कंडक्टरच्या या प्रश्नावर मुलीने माझ्याशी बोलू नका, असे उत्तर दिले. त्यानंतर कंडक्टर कोळी तिथून निघून गेला. मात्र, पुन्हा येऊन त्याने तोच प्रश्न विचारला. थोड्या वेळाने पुन्हा तो त्या मुलीजवळ आला आणि त्याने पुन्हा सेक्सबद्दल तिला प्रश्न विचारला. त्यावर मुलीने असले प्रश्न विचारू नका, असे उत्तर दिले. त्यानंतर मुलीचा बस स्टॉप आला आणि ती बसमधून उतरली. हा प्रसंग घडल्यामुळे या मुलीने शाळा सोडली होती. तसेच या घटनेची माहिती तिने आपल्या आई-वडीलांना दिली. त्यानंतर या कंडक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी विशेष न्यायालयाने कोळीला दोषी ठरवले असून पोक्सो कायद्यातील कलम १२ नुसार त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच न्यायालयाने त्याला एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
हेही वाचा - महाविकास आघाडीतील एक मोठा नेताच ओबीसी आरक्षणात 'झारीतील शुक्राचार्य' - चंद्रशेखर बावनकुळे