मुंबई -बुली बाई ॲप प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तराखंड मधील श्वेता सिंगला मुंबई पोलिसांनी उत्तराखंडमध्ये मंगळवारी 4 जानेवारी रोजी अटक केली. ( Bulli Bai App Case master mind arrested ) तिला ट्रांझिट रिमांडवर आपल्या ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण केली. आज (बुधवारी) तिला मुंबई आणण्यात आले आहे. तसेच आज तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याआधी पहिल्या आरोपीला मुंबई पोलिसांनी कारवाई करत बंगळुरुमधून ताब्यात घेतले होते. या आरोपीचे नाव विशाल कुमार झा आहे. मात्र, तो या प्रकरणातील मुख्य आरोपी नसून सह-आरोपी असल्याचे समोर आले आहे. ( Bulli Bai App Case )
रविवारी 2 जानेवारीला बंगळुरूमधून इंजीनियर विशाल कुमार झाला अटक करण्यात आली होती. विशाल कुमारकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मुख्य आरोपी आणि मास्टर माईंड ही महिला श्वेता सिंग असल्याचे समोर आले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी आरोपी महिलेला पकडण्याकरिता उत्तराखंडमधून तिला ताब्यात घेतले. आज बुधवारी तिला बांद्रा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. हे दोन्ही आरोपी एकमेकांना ओळखत असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
बुल्ली बाई अॅपवरून मुस्लीम महिलांना टार्गेट केले जाते. तसेच या महिलांचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावरून उचलून त्यांना ट्रोल करण्यात आले. या फोटोंचा बुल्ली बाई अॅपवरून लिलाव देखील करण्यात आला. याप्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चुतर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली आहे. आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली होती. तसेच महाराष्ट्रातील इतर राजकीय नेत्यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यानंतर महिलांची बदनामी आणि सायबर क्राईमचा गुन्हा दाखल करत मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला. सोमवारी एका 21 वर्षीय विद्यार्थ्याला बंगळुरूवरून ताब्यात घेण्यात आले. त्याचे विशाल कुमार झा असून, तो बिहारचा मूळ रहिवासी आहे. विशाल झा याला मुंबईतील बांद्रा मेट्रोपॉलिटन न्यायालयात हजर करण्यात आले असता अर्ध्या तासाच्या सुनावणीअंती त्याला 10 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
हेही वाचा -Bulli Bai App Case : बुली बाई अॅप प्रकरणातील आरोपी महिला पोलीसांच्या ताब्यात
महिला हाताळत होती ३ अकाऊंट -
मुख्य आरोपी महिला 'बुल्ली बाई' अॅपशी संबंधित तीन ट्विटर अकाऊंट हाताळत होती. सहआरोपी विशाल कुमारने खालसा वर्चस्ववादी नावाने खाते उघडले होते. ३१ डिसेंबर रोजी त्यांनी इतर खात्यांची नावे बदलली होती असंही मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.