मुंबई - केईएम रुग्णालयातील निवासी पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. केईएम रुग्णालयात अपुरी जागा असल्याने निवासी डॉक्टरांसाठी महापालिकेच्या वडाळा येथील 'अॅक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालया'च्या आवारात १५ मजली इमारत बांधली जाणार आहे. त्यासाठी पालिका १७५ कोटी रुपये खर्च करणार आहे. मात्र, परेल येथील रुग्णालयातील डॉक्टरांसाठी वडाळा येथील कृष्ठरोग रुग्णालयात वसतिगृह उभारले जाणार असल्याने त्याला विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केईएम रुग्णालयाच्या आवारात हेरिटेज इमारती असल्याने त्यांचा पुनर्विकास करणे अशक्य आहे. तसेच त्यांच्या दुरुस्तीसाठी हेरिटेज कमिटीची मान्यता घ्यावी लागते. परिणामी येथील इमारतींचा पुनर्विकास आणि वेळेवर डागडुजी करता येत नाही. २४ तास पालिका रुग्णालयात डॉक्टर सेवा देतात. परंतु, अपुऱ्या जागेमुळे त्यांना योग्य प्रकराची सुविधाही मिळत नाही. सन २०१७ मध्ये डेंग्यूचा प्रादूर्भाव वाढला होता, डॉक्टरांनाही यावेळी डेंग्यूची लागण झाली. यात २ डॉक्टरांचा बळी गेला होता. या पार्श्वभूमीवर तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी, १२०० शिकावू डॉक्टरांकरिता केईएम रुग्णालयाच्या वडाळा येथील अॅक्वर्थ रुग्णालयात नवे वसतिगृह बांधण्याचे निर्देश दिले होते. महापालिकेने तब्बल ३ वर्षानंतर येथे वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयाच्या एकूण ३४५३६.४२ चौ. मीटर जागेवर हे बांधकाम होणार असून येथे तळ अधिक १५ मजली इमारत उभी राहणार आहे.