मुंबई :आज दादर येथील हिंदू कॉलनी परिसरात असलेल्या रेन्ट्री या 15 मजली इमारतीच्या 13 व्या मजल्यावर पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत 60 वर्षीय व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला मिळालेल्या माहितीनुसार, दादर पूर्व येथील हिंदू कॉलनीत असलेल्या या इमारतीच्या 13 व्या मजल्यावर आज सकाळी 8:37 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्यामुळे सर्वत्र धुराचं साम्राज्य पसरलं होतं. या धुरात श्वास गुदमरल्यानं या इमारतीत राहणाऱ्या सचिन पाटकर या व्यक्तीचा मृत्यू झालाय.
श्वास गुदमरून मृत्यू :या आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. शर्थीच्या प्रयत्नानं बचावकार्य सुरू केलंय. तसंच या घटनेतील जखमी झालेल्या व्यक्तींना सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. परंतु 60 वर्षीय सचिन पाटकर या गृहस्थाचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आलंय. धुरामुळं श्वास गुदमरल्यानं त्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलंय. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पुढील तपास सुरू आहे.