मुंबई: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटच्या आठवड्यातील चौथ्या दिवशी, सकाळपासूनच विधान भवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. भाजपने राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विधानभवनात घोषणा दिल्या. तर विरोधकांनी पुन्हा एकदा राज्यात वाढलेली महागाई आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. भाजपकडून राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. दरम्यान उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व सोडल्याची टीका भाजप आणि शिंदे गटाच्या आमदार यांनी केली. महाविकास आघाडीकडून देखील अदानी के दलालो को जुते मारो सालो को, 50 खोके अशा घोषणा देत सत्ताधाऱ्यांना डिवचले.
सत्ताधारी आणि विरोधक: सत्ताधारी आणि विरोधक पायऱ्यांवर आमनेसामने आल्यामुळे विधानभवन परिसरात वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात एकत्र प्रवेश केला. ठाकरे गटाचे सर्व नेते यावेळी उपस्थित होते. दोघांनीही गेट वरती हस्तांदोलन करत पायऱ्यांवरून प्रसार माध्यमांना हातून जाऊन दाखवले. दोघांमध्ये यावेळी विविध विषयावर चर्चा झाली. सर्वांच्या त्यामुळे भुवया उंचावल्या आहेत. आगामी काळात फडणवीस आणि ठाकरे एकत्र येणार का अशी कुजबूज देखील विधिमंडळात सुरू झाली आहे. शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये मात्र धडधड वाढल्याचे यावेळी दिसून आले.