मुंबई :मुंबई महानगरपालिकेने आज 2023- 24 चा 52 हजार 619 कोटींचा अर्थसंकल्प मांडला आहे. पहिल्यांदाच 50 हजारांचा टप्पा ओलांडला असून ही 14.50 टक्के वाढ आहे. मात्र, या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कत्राटदारांचा नाही तर मुंबईकरांचा अर्थसंकल्प असून त्याचे स्वागत करीत असल्याची प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतील हवा प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून गेली आहे. त्यामुळे याबाबत तातडीने उपाय योजना करा, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही केली होती. त्यानुसार त्यांनी तातडीने पालिका आयुक्तांना सुचना केल्या होत्या. त्यामुळे यावेळी प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी अर्थसंकल्पात तब्बल 1500 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली, त्याचे आम्ही स्वागत करतो.
मुंबईकरांच्या मागणीतला अर्थसंकल्प : मुंबईकरांना चालण्यासाठी फुटपाथ देणे. ही पालिकेची जबाबदारी मान्य करुन 9 मिटर पेक्षा मोठ्या प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ देण्याची भूमिका पालिकेने घेतली. त्याचे मुंबईकरांच्यावतीने स्वागतच करीत असल्याचे सांगून नवे संकल्प केलेले नाहीत. त्यामुळे काही अपेक्षा आमच्या अजून होत्या. पण करवाढ मुंबईकरांवर लादली नाही. रस्ते, आरोग्य, कोस्टलरोड, अशा पायाभूत सेवा सुविधांंना केलेली तरतूद ही जमेची बाजू असल्याचेही शेलार म्हणाले. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तृतीय पंथीय यांचा संवेदनशीलपणे अर्थसंकल्पात विचार केला गेला आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे कंत्राटदारांच्या मर्जीतला हा अर्थसंकल्प नसून मुंबईकरांच्या मागणीतला अर्थसंकल्प आहे.