मुंबई- भारतीय जनता पार्टीचे राज्यातील तत्कालीन कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक भरतीत घोटाळा केल्याचे हे पुरव्यानिशी उघड झाले आहे. बहुजन समाज पार्ट्री मुंबई अध्यक्ष सुरेश विद्याधर यांनी हा घोटाळा उघडकीस आणला आहे. त्यामुळे प्रकाश मेहता यांच्यासह संबंधितांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी बहुजन पार्टी मुंबई यांच्याकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीचे महासचिव संजय उपाध्ये यांच्यामार्फत तत्कालीन कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी 574 उमेदवारांची भरती केली होती. यामध्ये मेहता यांनी खास बाब म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव आणून बेकायदेशीर पद्धतीने भरती केली असल्याचे सबळ पुरावे बहुजन समाजवादी पार्टीने उघडकीस आणले आहेत. मेहता यांनी बोगस हजेरीपट व कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार गैरवापर करून सुरक्षारक्षकांची भरती केली असल्याचा आरोप बहुजन पार्टीने शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
या भरतीत शासनाने निर्देशित केलेल्या अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, धनगर, वंजारी इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्गीय संविधानात्मक आरक्षण असणाऱ्या प्रवर्गाच्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे. तसेच ही भरती प्रक्रिया पार पडत असताना शासनाचे कोणतेही निर्देश पाळले नसल्याचा ही आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे या भरती प्रक्रियेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी व तत्कालीन कामगार मंत्रीमंडळाचे अध्यक्ष सचिव कामगार आयुक्त यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही विद्याधर यांनी केली आहे.
या भरती घोटाळ्यात जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर तातडीने कारवाई व्हावी, यासाठी राज्य शासनाने तात्काळ या घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीचा आदेश द्यावेत. अन्यथा बहुजन समाज पक्षाच्या वतीने या घोटाळ्याच्या विरुद्ध जन आंदोलन उभारण्यात येईल. तसेच या जनआंदोलनात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील, असे विद्याधर यांनी सांगितले.