मुंबई -राज्यात कडक निर्बंध लागू करून अत्यावश्यक सेवेतील दुकांनातील वस्तू खरेदीच्या नावाखाली नागरिक रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत. परिणामी गर्दी वाढू लागल्याने राज्य सरकारने नव्याने निर्बंध लादत हॉटेल-रेस्टॉरंट वगळता अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच्या वेळेचे बंधन घातले आहे. यासंबंधीचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी 'ब्रेक द चेन'अंतर्गत नव्याने जारी केले आहेत.
दुकाने सुरू ठेवण्यास निर्बंध -
कोविडचा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. आदेशान्वये सर्व अन्न व धान्याची दुकाने, किराणा दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, फळांची दुकाने, दुधाच्या डेअरी, बेकरी दुकाने, मटन-चिकन-अंडी-मासे-पोल्ट्री दुकाने, कृषी विषयक दुकाने, कुत्र्यांच्या खाद्यान्नाची दुकाने आणि पावसाळी वस्तुंच्या विक्रीची दुकाने सकाळी ७ ते ११ या कालावधीतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर ही दुकाने सुरू ठेवण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
सरकारची परवानगी बंधनकारक -
ही दुकाने बंद ठेवण्यात येणार असली तर या दुकानातील मालांची होम डिलीव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सकाळी ७ ते संध्याकाळी ८ यावेळेत दुकानदारांना आपल्या ग्राहकांना मालांची होम डिलीव्हरी करता येणे शक्य राहणार आहे. सदरच्या वेळा कमी जास्त करण्याचे अधिकार राज्य सरकारने स्थानिक प्रशासनास दिले आहेत. मात्र, अन्य दुकाने, सेवा यांचा समावेश स्थानिक प्रशासनास करावयाचा असेल तर त्यासंबधी राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक करण्याचे नमूद यात आहे.