मुंबई :मुंबई शहरावर हल्ला करून दहशत माजविणारे फोन कॉल मुंबई पोलिसांना आता नित्याचेच झाले आहे. मुंबईवर हल्ला करण्यासंदर्भात एक फोन मुंबई पोलिसांना आला होता. त्या संदर्भात मुख्य नियंत्रण कक्षाकडून बोरिवली पोलिसांना माहिती 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता प्राप्त झाली. यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बोरिवली पोलिसांनी असा कॉल देणाऱ्या व्यक्तीस अवघ्या एका तासात अटक केली आहे. त्या विरोधात कलम 505 (1) (ब) 505 (2) 507, 182 भादवीस नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी अतिशय जलदगतीने आपली तपासचक्रे फिरविली. आरोपीला थोड्याच कालावधीत गजाआड केले.
मुंबईवर हल्ला करण्याची त्यांची चर्चा :मिळालेल्या माहितीनुसार, 13 फेब्रुवारी रोजी सात वाजता पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाकडून बोरिवली पोलिसांना मुंबईवर हल्ला करून दहशत माजवण्याच्या फोन कॉल संदर्भात माहिती मिळाली होती. यानुसार काही वेळापूर्वी व्यक्तीने बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ ऑटो रिक्षा पकडली. अगोदरच त्या रिक्षात दोघेजण बसले होते. मुंबईवर हल्ला करण्याची त्यांची चर्चा सुरू होती. नंतर या तिघांनी ती रिक्षा गोविंद नगर बोरीवली पश्चिम येथे सोडली. मात्र त्या रिक्षाचा नंबर माहिती नसल्यासंदर्भात फोन कॉल करणाऱ्याने पोलिसांना कळवले होते.