मुंबई- मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मुंबई उच्च न्यायालय 27 जून रोजी अंतिम निर्णय देणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यभर निघालेल्या लाखोंच्या मूक मोर्चानंतर राज्य सरकारने लागू केलेल्या 16 टक्के आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात 27 जूनला अंतिम निर्णय - अंतिम निर्णय
राज्यभर निघालेल्या लाखोंच्या मूक मोर्चानंतर राज्य सरकारने लागू केलेल्या 16 टक्के आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
यावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर 6 फेब्रुवारी पासून 26 फेब्रुवारीपर्यंत दररोज सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणी दरम्यान विरोधी याचिकाकर्त्यांचे व समर्थन करणाऱ्या याचिकांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतल्यावर या बद्दलचा अंतिम निर्णय मुंबई उच्च न्यायालय 27 जून रोजी देणार आहे.
मराठा आरक्षणविरोधी याचिकेच्या संदर्भात अॅड. गुणरत्न सदावर्ते, अॅड. प्रदीप संचेती, अॅड. श्रीहरी अणे यांच्यासह इतर याचिकर्त्यांच्या वकिलांचे युक्तिवाद न्यायालयात पूर्ण झाले. राज्य सरकारकडून मराठा आरक्षणच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. आता गुरुवारी राज्य सरकारने देऊ केलेले 16 टक्के मराठा आरक्षण कितपत टिकते हे गुरुवारी स्पष्ट होईल.