मुंबई: राज्यातील नागरिकांचे रक्षक असलेले पोलीसच भक्षक झाल्याचे दिसून येत आहे. डेक्कन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे यांनी खंडणी वसूल केल्याचा आरोप झाला आहे. बांधकाम व्यावसायिकाकडून पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांनी 35 लाख रुपये आणि एक फ्लॅट आणि तसेच त्याची कार हडप केली आहे. त्यासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणेला हजर राहण्याचे निर्देश दिले. जर हजर नाही झाले तर त्यांना आणण्याचा ऑर्डर जारी करू, असा इशारा न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी दिला.
रिट याचिका दाखल: पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे यांच्यावर खंडणी वसुलीचा आरोप आहे. मुजिब पिंजारी या बांधकाम व्यवसायिकाकडून फ्लॅट आणि पैशांची खंडणी वसूल केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या बांधकाम व्यावसायिकाच्या मालकीचा कल्याण येथील एक फ्लॅट तसेच त्याच्या बँकेतील 35 लाख रुपये. त्याचबरोबर व्यावसायिकाची कार सोनवणे यांनी जबरदस्तीने हडप केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात बांधकाम व्यवसायिकाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. परंतु त्याला न्याय मिळत नव्हता, म्हणून त्याने रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्याबाबत आज सुनावणी झाली. परंतु या सुनावणीत पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे हजर नव्हते. पुढील सुनावणीच्या वेळी त्यांनी उपस्थित राहावे,अन्यथा ऑर्डर पास करू, असा इशारा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे.
पैशांची खंडणी घेतली: मुजिब पिंजारी या बांधकाम व्यावसायिकाला पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे यांनी 13 दिवस पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये विनाकारण तुरुंगात ठेवले होते. त्यावेळी सोनवणे यांनी त्यांच्याकडून 35 लाख रुपयांची रक्कम त्यांच्या बँकेमधून लुटली. तसेच त्याचा कल्याणमधील एक फ्लॅटदेखील हडप केला. यासंदर्भात मुजिब पिंजारी याने कल्याण आणि पुणे या दोन्ही पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. परंतु तक्रार करुनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळेच रिट पिटीशन न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर हे दाखल झाली. यावर सुनावणी करताना खंडपीठाने पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणेला पुढच्या सुनावणीच्या वेळी हजर राहण्याचे निर्देश दिले.