मुंबई :2022 मध्ये मुंबईतील दहिसर येथे ऑक्टोबरमध्ये एका वकिलानं आपल्या अशिलाची सवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पतीला जामीन मिळवून देतो, असं खोटे आश्वासन देऊन वकिलानं एका महिलेची फसवणूक केली होती. त्यामुळं वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वकिलानं अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल यांच्या न्यायालयानं 'वकिलानं खोटा व्यवहार केल्याचं' म्हणत त्यांचा अटकविरोधी जामीन अर्ज फेटाळला. यासंदर्भात उच्च न्यायालयानं 6 जानेवारी रोजी आदेश जारी केला आहे.
वकिलाची उच्च न्यायालयात धाव : ऑगस्ट 2022 मध्ये एका महिलेनं तिच्या पतीसंदर्भात वकिलाकडं जामिनासाठी प्रकरण दिलं होतं. त्यावेळी वकिलानं पतीला जामीन मिळवून देण्याचं अश्वासन दिलं होतं. त्यासाठी 65 हजार रुपये फीस लागेल, अशी मागणी वकिलानं केली होती. मात्र, पतीचा जामीन होत नसल्याचं महिलेच्या लक्षात आल्यानं तिनं वकिलाविरोधात दहिसह पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यावरनंतर संबंधित वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळं अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी वकिलानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी वकिलाचा जामीन अर्ज फेटाळून लावला. " वकिली व्यावसायाला शोभणारं वकिलाचं वर्तन दिसत नाहीय. त्यामुळं वकिलाचा जामीन अर्ज फेटाळून लावत आहे," असं न्यायालयानं आदेशात म्हटलंय.
- पतीला जामीन मिळवून देतो : पीडित महिलेचा पतीवर 2021 मध्येच कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळं पतीला जामीन मिळण्यासाठी महिलेचा प्रयत्न सुरूच होता. त्यामुळं तिनं वकिलाशी याबाबत विचारणा चर्चा केली होती. तेव्हा, वकिलानं 'तुझ्या पतीला जामीन मिळवून देतो, असं म्हणत 65 हजार रुपये फी आकारली होती.