मुंबई Bombay High Court : नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचा कोट्यवधींचा भूखंड बळकावून त्यातील काही भागाची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री केल्याच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी नागपूर येथील वकील सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके हे दोघंही पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्ज याचिकेवर गुरुवारी (2 नोव्हेंबर) सुनावणी झाली असता दोन्ही भावंडांचा जामीन अर्ज न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या एकलपीठानं फेटाळून लावलाय.
मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत तथ्य समोर आल्याचं न्यायालयाचं निरीक्षण :अंमलबजावणी संचालनालयाच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती दिघे यांनी आदेशात नमूद केलं की, बेकायदेशीर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दोन्ही भावांचा सहभाग असल्याचं तथ्य समोर आलंय. त्यामुळं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात येत आहे.
खोट्या खटल्यात अडकवण्याचा प्रयत्न :वकील सतीश उके यांच्या वतीनं जेष्ठ वकील मिहीर देसाई यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, उके बंधू त्यांच्या घरात असताना 40 पेक्षा अधिक सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्सचे अधिकारी त्यांच्या घरात घुसले. कोणत्याही वॉरंट विना त्यांच्या घराची झडती घेतली. एक खटला 2007 मध्ये दाखल झाला, तर दुसरा खटला 2018 मध्ये दाखल झाला. तसंच वकील सतीश उके यांना 24 तासाच्या आत कोणत्याही न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं नाही. त्यामुळं त्यांना खोट्या खटल्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचंही मिहीर देसाई म्हणाले.