मुंबई :खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे खादी हा शब्द आणि चरखा या नोंदणीकृत व्यापरचिन्हाचा (Khadi and Charkha symbols) ट्रेडमार्क कायद्यानुसार (Trademark Act) तुर्तास वापर न करण्याचे आदेश मुंबई ग्रामोद्योग संघटनेला हायकोर्टाने (Bombay High Court) दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे खादी ग्रामोद्योगाला काहिसा दिलासा मिळालेला आहे.
खादी चिन्हाचा वापर :नोंदणीकृत असलेला खादी हा शब्द आणि चरखा या लोगोचा मुंबई खादी आणि ग्रामोद्योग संघटना व्यापारासाठी वापर करत असल्याचा दावा करत आयोगाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. साल 2021 मध्ये ही बाब लक्षात येताच त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या नोंदणीकृत शब्द आणि चिन्हाचे उल्लंघन झाल्याचा दावा आयोगाने या याचिकेतून केला आहे. याआधी प्रतिवादी संघटनेने केव्हीआयसीच्या प्रमाणपत्राशिवाय खादी चिन्हाचा वापर करून उत्पादन विकणार नाही, अशी हमी न्यायालयात दिल्यानंतर आयोगाने दाखल केलेला सूट मागे घेतला होता. मात्र प्रतिवादी संघटना त्यानंतरही ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन करत असून न्यायालयाला दिलेल्या आश्वासनाचे उल्लंघन करत असल्याचा दावाही या याचिकेतून करण्यात आला आहे. न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्यासमोर यावर नुकतीच सुनावणी पार पडली.