मुंबई -राज्यातील म्युकरमायकोसिसच्या परिस्थितीसह कोरोनासंबंधित याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात प्रदीर्घ चर्चा आजच्या सुनावणीत करण्यात आली. न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी झाली.
म्युकर मायकोसिसकडे लक्ष द्या.. सध्या रेमडेसिवीर, ऑक्सिजन पुरवठा ही समस्या नाही - उच्च न्यायालय
मे महिन्यात राज्यभरात लहान मुलांना म्यूकरमायोसिसची लागण झाल्याच्या बातम्या आल्याचे याचिकाकर्त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणले.
आजच्या सुनावणीदरम्यान काळ्या बुरशीचा (ब्लॅक फंगस) रोग भयानकरित्या राज्यात पसरतोय, अशी याचिकाकर्त्यांकडून माहिती मुंबई उच्च न्यायालयात दिली गेली. तसेच मे महिन्यात राज्यभरात लहान मुलांना म्युकर मायकोसिसची लागण झाल्याच्या बातम्या आल्याचे याचिकाकर्त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणले. त्यामुळे टास्कफोर्स बनवण्या व्यतिरिक्त राज्य सरकार काय करतंय?, असा प्रश्न याचिकाकर्त्यांकडून उपस्थित केला गेला. त्यावर आम्ही यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. देशपातळीवर सध्या यावरील औषधाचा तुटवडा आहे. सध्या आम्ही दिलेल्या निर्देशांची पूर्तता करत आहोत, अशी ग्वाही राज्य सरकारने कोर्टात दिली.
हा रोग साथीच्या रोगाप्रमाणे पसरणारा नाही. काही विशिष्ठ वैद्यकीय समस्या असलेल्यांनाच तो होतो, अशी भूमिका सरकारकडून उच्च न्यायालयात मांडण्यात आली. राज्यात सध्या रेमडेसिवीर, ऑक्सिजन पुरवठा हे समस्येचे मुद्दे उरलेले नाहीत. तेव्हा आपण म्युकरमायकोसिस आणि त्याच्याशी संबंधित मुद्यांवर लक्ष द्यायला हवं, असा सल्ला प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाने दिला. तसेच 8 जूनच्या पुढील सुनावणीत राज्य आणि केंद्र सरकारला काळ्या बुरशीवर म्हणजेच ब्लॅक फंगसबद्दल सविस्तर माहिती देण्याचे कोर्टाकडून निर्देश देण्यात आले. आता 8 जून ला या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय सुनावणी घेणार आहे.