मुंबई - टीआरपी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी बीएआरसीचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दासगुप्ता यांना २ लाख रुपयांच्या बाँडवर आणि अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन शर्तीचा एक भाग म्हणून दासगुप्ता यांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत सहा महिन्यांसाठी हजेरी देणे आवश्यक असेल.
अखेर जामीन मंजूर
बहुचर्चित टीआरपी घोटाळा मुंबई पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर या संदर्भात आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आलेली आहे. यातील १४ जणांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला आहे. मात्र, बीएआरसीचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना जामीन मिळाला नव्हता. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली होती. तेव्हा पार्थो दासगुप्ता यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आलेली होती. न्यायालयाने ही याचिका अनेकदा फेटाळली. आज पुन्हा पार्थो दासगुप्ता यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली. यात मुंबई उच्च न्यायालयाने दासगुप्ता यांचा जामीन मंजूर केला आहे.
मुंबई पोलिसांनी केला होता विरोध
दरम्यान, मुंबई पोलिसांनी दासगुप्ता यांच्या जामीनाला विरोध केला होता. मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हणण्यात आले आहे की, काही निवडक वृत्तवाहिन्यांना टीआरपी वाढवून देण्यासाठी बार्ककडून करण्यात आलेल्या अफरातफरीची माहिती याच संस्थेतील एका महिला अधिकाऱ्याने तिच्या वरिष्ठांकडे केली होती. मात्र, या महिला अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकून न घेता पार्थो दासगुप्ता यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. उलट त्या महिलेला तिच्या पदावरून हटवण्यात आल्याचाही मुंबई पोलिसांनी दावा केलेला आहे.
रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्याकडून पार्थो दासगुप्ता यांना टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी 40 लाख रुपये टप्प्याटप्प्याने देण्यात आले होते. याबरोबरच परदेश पर्यटनासाठीसुद्धा दोन वेळा 12 हजार अमेरिकन डॉलर देण्यात आले होते. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी व पार्थो दासगुप्ता या दोघांनी एकेकाळी एका संस्थेत काम केले होते.
हेही वाचा -कोरोनामुळे भारतीय मसाल्यांच्या मागणीत वाढ; 'या' मसाल्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी
हेही वाचा -मंगळवारपासून 'मेरीटाईन इंडिया समिट 2021'ची सुरुवात; 24 देशातील प्रतिनिधी होणार सामील