मुंबई-बॉलिवूड संदर्भात केलेल्या विवादीत पोस्ट प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई उच्च न्यायलयाने दिलेला दिलासा कायम आहे. 25 जानेवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायलयाने पोलिसांना दिले आहेत. मात्र, देशद्रोह प्रकरणात कंगनाची आणखी चौकशी करण्याची गरज असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायलयात दिली आहे.
काय आहे प्रकरण ?
कंगना राणौत हिने सोशल माध्यमांवर बॉलीवूड इंडस्ट्रीबद्दल विवादीत ट्वीट केले होते. बॉलीवूडमध्ये हिंदू-मुस्लीम असे गट असल्याचा दावा तीने ट्वीटद्वारे केला होता. याबरोबरच मुस्लिम बहुल चित्रपट सृष्टीत मी स्वतः माझं नाव मोठे केले असल्याचे तिने म्हटले होते. मात्र, बॉलीवूडचे जातीपातीशी काही घेणेदेणे नाही आणि कंगनाच्या टि्वटमुळे सामाजिक द्वेष वाढल्याचा आरोप करत कास्टिंग डायरेक्टर मुनावरअली सय्यद यांनी बांद्रा न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. त्यानंतर कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यासंबंधी कंगना व रंगोली चंदेल यांची चौकशी करण्यासाठी त्यांना बऱ्याच वेळा पोलिसांनी समन्स पाठवले होते. तरीही कंगना चौकशीसाठी गैरहजर राहिली होती. मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाकडून तिला काही वेळासाठी दिलासा मिळाला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायलयानेच ८ जानेवारीला कंगना आणि तिची बहिण रंगोलीला वांद्रे पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर कंगना आणि तिची बहिण वांद्रे पोलीस स्थानकात हजर झाल्या. तब्बल २ तास चाललेल्या चौकशीनंतर त्या बाहेर पडल्या.