मुंबई Bombay High Court :मुंबईतील अँटॉप हिल येथे वकील हरिकेश शर्मा आणि महिला वकील साधना यादव यांच्यावर पोलिसांनी हल्ला केल्याच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी इंग्रजीत लिहिलेल्या एफआयआरवरुन न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठानं पोलिसांना फटकारले. 'महाराष्ट्रात मराठी शिवाय दुसऱ्या कुठल्या भाषेमध्ये एफआयआर लिहावा अशी कोणत्या कायद्यात तरतूद असेल ते दाखवा,' असं म्हणत न्यायालयानं पोलिसांना प्रतिज्ञापत्र ताबडतोब सादर करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, यासंदर्भातील आदेश पत्र 13 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं जारी केलं आहे.
पीडित वकिलांचे बाजू मांडणारे वकील काय म्हणतात : यासंदर्भात वकील आनंद काटे यांनी सांगितले की, अँटॉप हिल परिसरात वकील हरिकेश शर्मा आणि साधना यादव एका महत्त्वाच्या घटनेबाबत तक्रार करायला पोलीस ठाण्यात गेले असता त्यांच्यावर तेथील कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केली. तसंच महिला वकील साधना यादव यांना त्यांच्या केसांना पकडत ओढत फरपटत नेलं. त्यामुळं त्यांना जखमादेखील झाल्या. त्यानंतर त्यांनी पोलीस एफआयआर दाखल करत नाही म्हणून मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. 1 जुलै 2023 रोजी न्यायालयाच्या आदेशामुळं त्याबाबत पोलिसांना गुन्हा नोंदवावा लागला होता. परंतु पोलिसांनी एफआयआर नोंदवताना कायदेशीर चूक केली. ती चूक त्यांना महागात पडली. साधना ओमप्रकाश यादव आणि इतर विरुद्ध अँटॉप हिल पोलीस ठाणे अधिकारी नासिर कुलकर्णी आणि इतर पोलीस अधिकारी यांच्या खटल्यामध्ये न्यायालयानं हे कडक आदेश पत्र जारी केले आहे.