मुंबई :दिवसेंदिवस वाढत चाललेल्या भटक्या कुत्र्यांच्या मुद्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. तसेच कुत्र्यांचे पालनपोषण, संगोपन, आहार आणि लसीकरणासाठी विशेष यंत्रणा विकसित करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करून भटक्या कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या मुंबईतील द वेलफेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज या स्वयंसेवी संस्थेला सोमवारी उच्च न्यायालयाने सहकार्यासाठी पाचारण केले. त्यासाठी न्यायालयाने संस्थेला प्रतिवादी करण्याचे आदेश याचिकाकर्त्यांना दिले. या संस्थेच्यामार्फत भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यास मदत होईल असे मतही न्यायालयाने व्यक्त केले.
मध्यस्थीसाठी वकिलाची नियुक्ती : नवी मुंबईतील सीवूड्स इस्टेट्स या निवासी संकुलाच्या व्यवस्थापनामध्ये भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यावरून झालेला वाद उच्च न्यायालयात आल्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये उच्च न्यायालयाने मध्यस्थीसाठी वकिलाची नियुक्ती केली होती. सोमवारी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीमध्ये समस्येचे निवारण करण्यासाठी तोडगा आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
द वेलफेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज संस्थेचे सहकार्य :न्यायालयाने याप्रकरणी मागील अनेक दशकांपासून भटक्या कुत्र्यांसाठी कार्यरत असलेल्या मुंबईतील द वेलफेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज या संस्थेला सहकार्यासाठी पाचारण केले. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त असते. त्यांच्या नियंत्रणासह पालनपोषण, आहार, संगोपन आणि लसीकरणासाठी विशेष यंत्रणा विकसित होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने करणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या झटणाऱ्या संस्थांची मदत घेणे योग्य ठरेल असे स्पष्ट करून न्यायालयाने संस्थेला प्रतिवादी करण्याचे आदेश दिले.