मुंबईBombay HC On Decision For Orphan Child : नेस्ट इंडिया फाउंडेशन मुंबई यांनी अनाथ बालकांच्या संदर्भात शासनाकडून शासन निर्णयात भेदभाव केला जातोय, अशी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे, न्यायमूर्ती फिरोज पुनिवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठानं सांगितलंय की, गैरसरकारी संस्था आणि शासकीय संस्थांमधील अनाथ बालकांच्या संदर्भात सरकारकडून भेदभाव कसा करता येऊ शकतो? केंद्र शासनाच्या बालकांच्या संरक्षणाच्या कायद्यामध्ये अनाथ बालकांची व्याप्ती वाढवता येईल काय? याचा विचार त्यांनी करावा, अशी विचारणा देखील शासनाला त्यांनी केलीय.
अनाथ मुलींना शासन प्रमाणपत्र :मुंबईतील नेस्ट इंडिया फाउंडेशन या एनजीओकडून मागणी केली गेलीय की, सोडलेल्या मुलींना अनाथम्हणून शासनानं जाहीर करावं. त्याचं प्रमाणपत्र द्यावं. मात्र, शासनाचा तसं प्रमाणपत्र द्यायला नकार आहे. शासनाच्या या भूमिकेवर उच्च न्यायालयानं कठोर शब्दात प्रहार केलाय. शासन सरकारच्या संस्था आणि बिगर शासकीय संस्था या संदर्भात भेदभाव करत आहे का? असा प्रश्न देखील केलाय.
बालकांच्या कायद्यामध्ये बदल करा :खंडपीठानं हे देखील विचारलंय की, केंद्र शासनाच्या बालकांची काळजी आणि संरक्षण कायद्यामध्ये अनाथ बालकांमध्ये सोडलेल्या अनाथ बालकांबाबत व्याप्ती वाढवता येणार किंवा नाही. शासनानं हे नक्की करावं. जर शासन अनाथ बालकांच्या संदर्भात त्यांना हक्क बहाल करत नसेल, तर या सोडलेल्या बालकांबाबत आता उच्च न्यायालयच त्याचा विचार करून निर्देश देईल, असं देखील खंडपीठानं निर्णय देताना नमूद केलंय. शासनानं अनाथ बालकांच्या आरक्षणाबाबत काय करता येऊ शकतं, अशी प्रश्नांची मालिकाच उच्च न्यायालयानं ठेवलीय.