मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने मुंबई पालिकेच्या वॉर्ड रचनेत बदल केले होते. महाविकास आघाडी सरकारचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकराने बदलत मुंबई पालिकेची वॉर्ड रचना 227 ऐवढी केली होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रभागांचे परिसीमन 236 वरून 227 वर बदलण्याच्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या दोन माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.
बीएमसी निवडणुकीचा मार्ग मोकळा - मुंबई महापालिका वार्ड रचनेत हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. ठाकरे गटाने याबाबतची याचिका केली होती. शिवसेना माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी याबाबत न्यायलयात आव्हान दिले होते. न्यायालयाने याबाबतचा निकाल राखून ठेवला होता, तो आज जाहीर केला आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता मुंबई मनपा निवडणुकीत फक्त 227 प्रभाग रचना असणार आहेत. ऑनलाइन सुनावणीवेळी न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे.
ठाकरे गटाला धक्का - राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना मुंबई महापालिकेच्या वॉर्ड रचनेत बदल करण्यात आले होते. 236 ऐवढी वॉर्ड रचना केली होती. मात्र, नंतर एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांची सत्ता स्थापन झाल्यावर पुन्हा 227 वॉर्ड रचना केली होती. याला विरोध म्हणून ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.