मुंबई- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडून मेट्रो 4 (वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली) व 4 अ (कासारवडवली-गायमुख) मेट्रो मार्गाचे बांधकाम सुरू आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्यादृष्टीने आता एमएमआरडीएने आणखी महत्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. ते म्हणजे आता रोलिंग स्टॉकच्या कामाला सुरुवात केली आहे. या मार्गासाठी 39 गाड्या अर्थात 234 डबे तयार करण्यासाठी जपानी कंपनी बंबार्डीयरला कंत्राट दिले आहे. ही कंपनी पुढील 160 आठवड्यात या गाड्या तयार करून मुंबईत पाठवणार आहे. त्यानुसार पहिली गाडी 2023 मध्ये मुंबईत दाखल होणार आहे.
32.32 किलोमिटरच्या मार्गामुळे मुंबई-ठाणे अंतर होणार कमी
मुंबई महानगरात (एमएमआर) मेट्रोचे जाळे एमएमआरडीएकडून विणले जात आहे. त्याचच भाग म्हणून मुंबई ते ठाणे अंतर कमी करण्यासाठी मेट्रो 4 व 4 अ प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतले आहेत. या प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू आहे. तर हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई ते कासारवडवली हे अंतर काही मिनिटांत पार करता येणार आहे. 32.32 किमी लांबीचा हा मेट्रो मार्ग आहे. यासाठी 14 हजार 549 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गात 32 मेट्रो स्थानके असून हा मार्ग मेट्रो 3 सह अन्य मेट्रो मार्गाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे मेट्रो 4 वरून अन्य मार्गावरून ही प्रवास करण्यात येणार आहे.