मुंबई :मुंबईत बकरी ईद आणि आषाढी एकादशीचा सोहळा रंगलेला असतानाच मुंबईला एक व्यक्ती बॉम्बने उडवून देणार आहे, अशी माहिती एका कॉलरने दिली. या बातमीने एकच खळबळ उडाली होती. मालवणी पोलिसांनी तात्काळ तपास करत कॉल करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. नासिमूल हसन रफी उल हसन शेख (वय 50) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने टाइमपास म्हणून कॉल केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा उद्देश :मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास नासिमूल हसन शेखने महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षात कॉल केला. कॉल करून एक व्यक्ती मुंबई उडवून देणार असल्याची छोटी माहिती देत फोन कट केला. हा मालवणीतील आजमी नगर येथील अब्बा सिया या कंपाउंडमध्ये राहतो. तो इलेक्ट्रिशियनचे काम करतो. मुंबईत सगळे शांततेत सुरू असताना सार्वजनिक शांतता भंग करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने कॉल केला. या प्रकरणी त्याला अटक करत पोलीस अधिक तपास करत आहेत. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.