मुंबई :बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ने अमली पदार्थ प्रकरणी मीडिया देत असलेल्या बातम्या थांबवण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या आधीही तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मीडिया प्रसारित करत असलेल्या बातम्यांमुळे तिची प्रतिमा मलीन होत असल्याचे म्हटले होते.
ड्रग्ज प्रकरणी रकुल प्रीत सिंहची दिल्ली उच्च न्यायालयात धाव, मीडिया कव्हरेज थांबवण्याची केली मागणी - बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण
अमली पदार्थ प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचेही नाव समोर आले आहे. याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तिचीदेखील चौकशी करण्यात आली. यादरम्यान मीडियाने चालवलेल्या बातम्यांमुळे आपली प्रतिमा मलीन होत असल्याचे म्हणत रकुलने दिल्ली उच्च न्यायालयात अशा बातम्यांचे प्रसारण थांबवण्याबाबत याचिका दाखल केली आहे.
रकुलने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत, अमली पदार्थ प्रकरणाबाबत प्रसारित होत असलेल्या बातम्यांमुळे आपली प्रतिमा मलीन होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, जोपर्यंत एनसीबी त्यांची चौकशी पूर्ण करून न्यायालयापुढे अंतिम अहवाल सादर करत नाही. तोपर्यंत अशा कोणत्याही बातम्या प्रसारित न करण्याची मागणी रकुलने केली आहे. या याचिकेअंतर्गत पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. याआधी १७ सप्टेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने रकुल प्रीतने दाखल केलेल्या याचिकेवर केंद्राकडून उत्तर मागितले होते.
बॉलिवूड अमली पदार्थ प्रकरणात एनसीबीने शुक्रवारी रकुल प्रीत सिंहची चौकशी केली. तिने रियासोबत ड्रग्जबाबत चॅट केल्याचे तिने मान्य केल्याची माहिती सूत्रांकडून कळते. यासोबतच तिने अमली पदार्थाचे सेवन केले नसल्याचेही म्हटले आहे. शुक्रवारी एनसीबीने दीपिका-रकुल व्यतिरिक्त अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचीही काही तास चौकशी केली होती. रकुल आणि सिमॉन या, सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीच्या जवळच्या मैत्रिणी असल्यामुळे त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी रिया, तिचा भाऊ शोविकसह अन्य १७ जणांना एनसीबीने अटक केली आहे.