मुंबई - दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल मुंबई पोलिसांना मिळाला आहे. या अहवालावर पाच डॉक्टरांच्या टीमच्या स्वाक्षऱ्या असून सुशांतचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
अंतिम शवविच्छेदन अहवालानुसार, सुशांत सिंह राजपूतच्या शरीरावर कोणत्याही संघर्षाचे किंवा जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. त्याचा मृत्यू गळफास घेतल्यानंतर श्वास गुदमरल्यामुळे झाला आहे. तसेच सुशांतच्या नखांमध्येही काहीच आढळले नसल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूवर शंका उपस्थित होत असून पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत २३ जणांचे जबाब नोंदवले आहे. यात सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, सुशांतचे वडिल आणि त्याच्या बहिणी, तसेच सुशांतचे मित्र, नोकर आणि इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. याव्यतिरिक्त दिग्दर्शक मुकेश छाबडा यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. पण आता शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे की, सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली असून त्यामध्ये कोणताही घातपात घडलेला नाही.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आला. 'काय पो छे!' या चित्रपटात सुशांत मुख्य अभिनेता होता. महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर चित्रित करण्यात आलेल्या एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातही काम केले होते.
हेही वाचा -दाक्षिणात्य अभिनेत्री शमना कासिमला धमकी दिल्याप्रकरणी चार तरुणांना अटक
हेही वाचा -सुशांतच्या आणखी एका चाहत्याने केली आत्महत्या