नवी मुंबई -खारघर सेक्टर 15 येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील एका बनावट डॉक्टरवर पनवेल महानगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. रोहित गुप्तेश्वर यादव (27) असे बनावट डॉक्टराचे नाव आहे. खारघरच्या डी मार्ट जवळील सेक्टर 15 या ठिकाणी खारघर मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलमध्ये विनाडिग्री बनावट डॉक्टर रूग्णांची तपासणी करुन उपचार करत असल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना मिळाली. हा बोगस डॉक्टर खारघर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात निवासी वैद्यकिय अधिकारी म्हणून कार्यरत होता.
बनावट रुग्णांना पाठवून बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी पनवेल महानगर पालिकेच्या डॉक्टरांना बोलावून या प्रकाराची माहिती दिली. तसेच, मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलमध्ये बनावट रुग्णांना पाठवले. बोगस डॉक्टर रोहितने रुग्णाला कोणताही आजार नसताना रुग्णालयाखाली असलेल्या मेडिकलमधून औषधे आणायला सांगितली. शिवाय, 1000 रुपये तपासणी शुल्कही घेतली.
सापळा रचून बनावट डॉक्टरला अटक
खारघर पोलिसांनी सापळा रचून संबधित रुग्णालयात छापा मारला आणि बनावट डॉक्टर आरोपी रोहित गुप्तेश्वर यादव याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली. त्यात, त्याने गोवंडी शिवाजीनगर मानखुर्द येथे कंपाऊंडरचे काम केले आहे. येथे तो आरएमओ म्हणून रुग्ण तपासात असल्याचे निष्पन्न झाले.