मुंबईBody Bag Scam Case :कोविड-19 काळात बाधित रुग्णांचे मृतदेह ठेवण्यासाठी 'बॉडी बॅग' खरेदीत झालेल्या कथित घोटाळा प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली. या कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात आता ईडीची एन्ट्री झाली आहे. ईडीनं मनी लॉन्ड्री कायद्यांतर्गत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच किशोरी पेडणेकर यांना चार आठवडे अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखा विभागानं याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन घेतली होती.(Covid Center Scam Case )या प्रकरणात न्यायालयानं त्यांना अटकेपासून दिलासा दिला होता. मात्र, आता या प्रकरणात केंद्रीय यंत्रणांची एन्ट्री झाल्यानं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे.
ED लवकरच चौकशीसाठी बोलावणार: या बाबत अधिक माहिती अशी की, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ज्या नोंदीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. त्याच आधारावर ईडीनं देखील गुन्हा दाखल केला आहे. ईडीनं दाखल केलेल्या अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवालात प्रकल्प विभागाचे माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त, माजी उपयुक्त यांच्यासह इतरही नावे आहेत. सदर कथित घोटाळ्याची एकूण रक्कम ही 49.63 लाख रुपये इतकी असल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर आहे. या प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर व इतर अधिकाऱ्यांना ED लवकरच चौकशीसाठी बोलावू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.