मुंबई -आधुनिक काळातील स्थापत्यशैलीचा अद्भुत नमुना अशी ओळख असणाऱ्या सीएसएमटी इमारतीला 132 वर्षे दिमाखात उभी आहे. हेरिटेज वास्तूमध्ये या इमारतीचा समावेश केला आहे. आशिया खंडातील पहिली रेल्वे गाडी बोरीबंदर स्थानकातून धावली. ते आताचे सीएसएमटी रेल्वे स्थानक म्हणून नावारुपाला आले असून त्याचा लौकिक जगभरात आहे. पूर्वीचे बोरीबंदर जे आता आता सीएसएमटी स्थानक म्हणून ओळखले जाते. याला १६८ वर्षांचा इतिहास आहे. याबाबत ईटीव्ही भारतने विशेष आढावा घेतला.
रेल्वे सेवा कधी सुरू झाली -
ब्रिटिश राजघराण्याच्या वतीने ईस्ट इंडिया कंपनी भारतातला कारभार सांभाळत होती. ब्रिटिश कापड गिरण्यांना लागणारा कापूस हा भारतातून ब्रिटनमध्ये निर्यात होणाऱ्या कच्च्या मालापैकी एक महत्त्वाचा घटक होता. हा कापूस भारतातल्या अंतर्गत भागांमध्ये तयार होत होता. देशाच्या विविध भागांतून कापूस मुंबईतल्या बंदरात आणायचा आणि मुंबईतून जहाजाने तो ब्रिटनला पाठवायचा, या कापसाच्या वाहतुकीसाठी रेल्वे उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी 1832 साली भारतात प्रथम रेल्वे वाहतुकीचा आराखडा मांडण्यात आला होता. त्यानंतर ब्रिटिश सरकारने 'ग्रेट इंडियन पेनिंन्सुल' (जी.आय.पी) या कंपनीला मुंबईपासून ते खान्देशाच्या दिशेने 56 किमी लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्याचे कंत्राट दिले होते.
ब्रिटिश सरकारने 14 नोव्हेंबर 1849ला जेम्स जॉन बर्कले या अवघ्या 30 वर्षाच्या ब्रिटिश इंजिनिअरवर रेल्वे प्रत्यक्षात साकारण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर ऑक्टोबर 1851मध्ये रेल्वेमार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. 16 एप्रिल 1853ला दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी मुंबई ते ठाणेदरम्यान आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली.
बोरीबंदर स्थानकाचा इतिहास -
आज लाखो लोकांच्या गदारोळात हरवून गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे रुपडे फार प्राचीन काळी काहीसे वेगळेच होते. १८५०मध्ये या परिसरामध्ये १९ एकर जमिनीवर पहिलेवहिले बोरीबंदर स्थानक होते. या स्थानकाचे नावही या परिसरात असलेली बोराची झाडे आणि समुद्र किनाऱ्यावरची बंदरे यावरून बोरीबंदर ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, बोरीबंदर वरून जहाजांमधून मुंबईसाठी सामान आणलं जायचे. या जहाजांमधून प्रवासी वाहतूकही व्हायची. एका बाजूला कठीण कातळ आणि दुसऱ्या बाजूला छोटी टेकडी असलेल्या बोरीबंदर जेट्टीवर उतरण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागायची. प्रवासी आधी जहाजांमधून किंवा लॉन्चमधून छोट्या बोटीमध्ये उतरायचे. मग किनाऱ्याजवळ आल्यावर दगडांवर उड्या टाकायचे. १८५२च्या सुमारास मोठ्या मालवाहू जहाजांच्या सोयीसाठी ही छोटी टेकडी कापून हा प्रदेश सपाट करण्यात आला. येथील दगड बाजूला करून मोठा धक्का बांधण्यात आला.
पहिल्यावहिल्या रेल्वे लाइनच्या बांधकामासाठी इंग्लंडहून जहाजातून आलेले सामान उतरवण्याचे बंदर म्हणून बोरीबंदरला विशेष महत्त्व आहे.
दुसरे आश्चर्यकारक स्थानक म्हणून ओळख -
१८७०च्या दशकापर्यंत बोरीबंदर स्थानकात अनेक सुधारणा करण्यात आल्या होत्या. हे स्थानक दर काही वर्षांनी अद्ययावत केले जात होते. यामुळे मुंबईच्या पूर्व किनारपट्टीचा चेहरामोहराच बदलून गेला. या बदलाची झळ बोरीबंदर स्थानकापर्यंतही पोहोचली. याच काळात टुमदार अशा बोरीबंदर स्थानकाचे रुप पार बदलून गेले. या जुन्या स्थानकाच्या दक्षिणेकडे व्हिक्टोरिया टर्मिनसची दिमाखदार इमारत उभी राहत होती. जिच्याकडे आज संपूर्ण जगाच्या पाठीवर दुसरे आश्चर्यकारक स्थानक म्हणून त्याकडे पाहिले जाते.