मुंबई- मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडण्यासाठी पालिकेने गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मुलुंड, नाहूर आणि भांडूपमधील मिठागरांची जागा पालिका ताब्यात घेणार आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ही जागा ताब्यात घेण्यासाठी पालिका ४४५ कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आचारसंहितेमुळे पालिकेच्या सुधार समितीमध्ये परत पाठवण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पाबाबतची प्रक्रिया रखडणार आहे.
पालिकेने पूर्व द्रुतगती मार्गापासून गोरेगाव दिंडोशीपर्यंत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून मुलुंड-गोरेगाव जोड रस्त्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा रस्ता पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणार तर आहेच शिवाय या प्रकल्पामुळे मुंबईत वाढलेल्या वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार आहे. यामध्ये ‘एस’ व ‘टी’ विभागातील पूर्व द्रुतगती मार्गापासून खिंडीपाडा येथे विकास नियोजन आराखडा २०३४ नुसार ४५.७० मीटर रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवातही झाली आहे. यामध्ये नाहूर स्थानकाजवळील उड्डाणपुलांचे कामही सुरू झाले आहे.
आता पुढील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मीठागरांची जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सोमवारी सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. मात्र, आचारसंहितेमुळे यावर कोणतीही चर्चा न करता सदर प्रस्ताव मंजुरीविना परत पाठवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुक मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.