मुंबई- कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीमध्ये बोगस लसीकरण झाल्याचे समोर आल्यानंतर पालिकेने कोव्हीशील्ड लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूटला पत्र पाठवले आहे. लसीच्या बॅचवरुन ही लस कोणाला पुरवण्यात आली याचा उलघडा आज (दि.२१ जून किंवा उद्या 22 जूनला) होणार आहे. सिरमकडून देण्यात आलेली माहिती पोलिसांना देण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. यामुळे या बोगस लसीकरणातील सूत्रधार लवकरच पकडले जाण्याची शक्यता आहे.
पालिकेचे सिरमला पत्र
कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीत झालेल्या बोगस लसीकरणानंतर खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिकेनेही सादर केलेल्या चौकशी अहवालात हे लसीकरण बेकायदेशीर व बोगस असल्याचे म्हटले आहे. मात्र, लस खरी होती की खोटी? याबाबतच्या पडताळणीसाठी लस उत्पादक सिरम इन्स्टिट्यूटला महापालिकेने पत्र पाठवले आहे. या पत्रात कांदिवली येथे लसीकरणा दरम्यान वापरण्यात आलेल्या लसीची बॅच पाठवण्यात आली आहेत. या लसी कुठे पुरवठा करण्यात आल्या होत्या याची माहिती मागवण्यात आली आहे. ही माहिती सिरम इन्स्टिट्यूटकडून आज (सोमवार) किंवा उद्या (मंगळवारी) पालिकेकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरणासाठी वापरलेली लस ही कोणाला पुरवठा करण्यात आली होती? हे समोर येणार आहे. तसेच ही माहिती पोलिसांना दिली जाणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले. यामुळे पुरवठा केलेल्या ठिकाणाहून कांदिवली येथे ही लस कशी पोहचली याचा शोध लावण्यास पोलिसांना मदत होणार आहे.