मुंबईParking Station In Worli : बृहन्मुंबई महानगरपालिकेनं G दक्षिण वॉर्ड म्हणजे वरळीमध्ये पार्किंग सुविधा तयार करण्याची योजना जाहीर केली आहे. पार्किंगची जागा डॉ. ई. मोसेस रोडवरील पालिका इंजिनिअरिंग हब इमारतीजवळ असेल. यात सुमारे 640 कार पार्क करता येतील. या कामासाठी पालिका तब्बल 216 कोटी रुपयांचा निधी खर्च करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. (Parking Station Tender)
पालिकेनी काढली निविदा :बृहन्मुंबई पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी 216.94 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा काढल्या आहेत. प्रगत, भूमिगत आणि उन्नत बहुस्तरीय पार्किंग व्यवस्था अशा योजना, डिझाइन तयार करू शकतील अशा इच्छुक कंपन्यांनी निविदा भराव्यात असं आवाहन पालिकेने केलं आहे. पालिकेने निविदांमध्ये इच्छुक असलेल्या कंपन्यांसाठी आवश्यकता देखील दिल्या आहेत. यामध्ये वार्षिक देखभाल व्यवस्थापित करणे आणि पूर्ण झाल्यानंतर वीस वर्षे पार्किंगची देखभाल करणे समाविष्ट आहे.
ब्ल्यू प्रिंट तयार करण्याची गरज :याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित ठेकेदाराला पाच वर्षे पार्किंग व्यवस्था चालवणे, देखभाल करणे आणि साफसफाईची जबाबदारीही घ्यावी लागणार आहे. निविदा काढण्यापूर्वी कंपनीला संपूर्ण पार्किंगची ब्ल्यू प्रिंट तयार करून माती परीक्षण करून घ्यावे लागेल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. कंत्राटदार कंपनीने पालिकेच्या अभियंत्यांना मजले, खड्डे, वीज, फायर अलार्म, पॉवर सोर्स, दर्शनी दिवे, मजल्यापर्यंतच्या रस्त्यांशी जोडणी आणि पार्किंगची जागा यासारख्या विविध पैलूंवर ते कसे काम करतील याचा प्लॅन देणे आणि याबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. या योजनांना नंतर पालिकेचे प्रभारी अभियंता मान्यता देतील.