मुंबई : मुंबईत नागरी वनांच्या माध्यमातून ५ लाखांवर झाडांची लागवड करण्याचा अभिनव उपक्रम यशस्वी झाला आहे. त्यानंतर आता मुंबईच्या हरितीकरणाला गृहनिर्माण संस्था व व्यक्ती स्तरापर्यंत नेण्यासाठी हरितीकरणाची मार्गदर्शकतत्त्वे आखली जाणार आहेत. यावर धोरण तयार करण्यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन महापालिकेकडून करण्यात आल्याची माहिती पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. ८ मार्चला वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईच्या हरितीकरणाला चालना : मुंबईत हरित क्षेत्रामध्ये वाढ व्हावी व मुंबईचे पर्यावरण समृद्ध व्हावे या उद्देशाने महापालिकेच्या उद्यान विभागाने भर दिला आहे. उद्याने, मोकळ्या जागांवर वृक्षारोपण, रस्ते दुभाजकांवर हरितपट्टे आदी ठिकाणी साडेचार लाखांपेक्षा अधिक वृक्षलागवडकरून नागरी वने निर्माण केली जाणार आहेत. नव्याने १ लाख वृक्ष लागवड केली जात आहे. अशा अनेक उपक्रमांमधून मुंबईच्या हरितीकरणाला चालना देण्यात आली आहे.
मुंबई लोकसहभागातून हिरवीगार :वर्ल्ड रिसोर्सेस इंडिया या संस्थेच्या सहकार्यातून महापालिकेच्या उद्यान विभागाने डिसेंबर २०२२ मध्ये कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये मुंबईला लोकसहभागातून हिरवेगार करण्याची गरज असल्याचा अहवाल तयार करण्यात आला होता. नागरिकांनी, गृहनिर्माण संस्थांनी तसेच लहान जागांवर देखील वृक्षारोपण, वेगवेगळे हरित उपक्रम राबवणे, नागरिक संस्था यांनी वृक्ष दत्तक घेणे, यासारख्या अनेक संकल्पना त्यामध्ये पुढे आल्या होत्या.