महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळामुळे बीकेसी कोविड सेंटरचे आतून नुकसान झालेले नाही; महापालिकेचा खुलासा

बीकेसीतील कोविड सेंटरला चक्रीवादळाचा फटका बसल्याच्या बातम्या बुधवारी प्रसिद्ध झाल्या होत्या. मुंबई महापालिकेने याबाबत ट्विट करुन खुलासा केला आहे. कोव्हिड सेंटरचे नुकसान झाले नसून आज संध्याकाळी रुग्ण सेवा सुरु होणार आहे.

BKC covid center
बीकेसी येथील कोव्हिड सेंटर

By

Published : Jun 4, 2020, 2:43 PM IST

मुंबई-निसर्ग चक्रीवादळाचा फटका बीकेसीतील कोविड सेंटरला बसला नसून आतील बाजूने कोणतेही नुकसान झालेले नाही. सोशल मीडियातुन खोट्या बातम्या पसरवल्या गेल्याचा खुलासा मुंबई महानगरपालिकेने एका ट्विटद्वारे केला आहे. आज संध्याकाळपासूनच हे सेंटर रुग्णसेवेत दाखल होईल, असेही पालिकेने सांगितले आहे. चक्रीवादळाचा फटका बीकेसीतील कोविड सेंटरला बसल्याच्या बातम्या बुधवारी प्रसिद्ध झाल्या होत्या.

निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पालिकेने 242 रुग्णांना मंगळवारीच वरळीत हलवले. मुळात ताशी105 कि.मी. वेगाने वारे आले तरी सेंटरच्या बांधकामाला फटका बसणार नाही, अशी साधने वापरत त्याची उभारणी करण्यात आली आहे. पण निसर्ग चक्रीवादळादरम्यान ताशी 120 कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता होती. त्यामुळे रूग्ण हलवण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता, असे स्पष्ट करण्यात आले आहे

बुधवारी मुंबईवरचे संकट टळले खरे मात्र पाऊस-वाऱ्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले. बीकेसीतील कोव्हिड सेंटरलाही फटका बसला अशा बातम्या आल्या. पण खरे पाहता सेंटरला कोणताही फटका बसला नाही. आतून कोणतेही नुकसान झाले नसून सेंटर होते तसेच असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

कोव्हिड सेंटरच्या कुंपणाचे थोडेफार नुकसान झाले. मैदानात पाणी साठून चिखल झाला. पण सेंटर आहे तसे असून ते आज संध्याकाळी पुन्हा सुरू होणार आहे, असेही पालिकेने ट्विटमध्ये म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details