मुंबई: शहर आणि उपनगरात शौचालये म्हाडाच्या जागेवर बांधण्यात आली आहे. त्यापैकी अनेक शौचालये मोडकळीस आली आहेत. काही शौचालयांचे दरवाजे तुटले आहेत, काहींच्या भिंती पडण्यास आल्या आहेत. काही शौचालयांची मोठी दुरुस्ती करण्याची गरज आहे. हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
स्थानिक नागरिकांनी शौचालयाच्या दुरुस्तीबाबत तक्रारी केल्या आहेत. या शौचालयांचे पुनर्बांधकाम गेले कित्तेक वर्षे रखडले होते. स्थानिक आमदार, खासदार यांच्या निधीमधून या शौचालयांची दुरुस्ती केली जात आहे. उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या शौचालयांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामधून या शौचालयांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी केली जाणार आहे. ज्या शौचालयांच्या बाजूला मलनिस्सारण वाहिनी नाही त्यांना वाहिनीशी जोडले जाणार आहे. त्यासाठी सर्व्हे करण्यात आला आहे.
२० हजार शौचकुपे बांधणार : मुंबईमध्ये वस्ती स्वच्छता कार्यक्रमानुसार शौचालये बांधली जात आहेत. शौचालये उभारताना अपंग, वयोवृद्ध, महिला आणि लहान मुले यांना गैरसोय होणार नाही अशी शौचालये बांधण्याची काळजी घेण्यात आली आहे. पालिकेने काही वर्षांपूर्वी लॉट ११ जाहीर केला होता. त्यामध्ये २२ हजार शौचकूपे बांधली जाणार होती. त्याधील १८ हजार ३९९ शौचकूपे बांधण्यात आली आहेत. १५४५ शौचकुपांची काम अद्याप बाकी आहेत. असे असताना पालिकेने नव्याने लॉट १२ मध्ये २० हजार शौचकुपे बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
या आहेत समस्या:मुंबईमधील शौचालयांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात लिकेज, सिव्हरेज लाईन, लाईट बिल, सेफ्टीक टॅंक, पाणी बिल आदी समस्या समोर आल्या आहेत. याची माहिती पालिका प्रशासनाला दिल्यावर काही बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. आता पालिका लॉट १२ मधील शौचालये बांधत आहेत. ही शौचालये बांधताना लॉट ११ मध्ये ज्या समस्या समोर आल्या त्या दूर कराव्यात अशी मागणी कोरो इंडिया संस्थेच्या व राईटपीच्या कार्यकर्त्या किरण खंडेराव यांनी केली आहे.
हेही वाचा:MHADA Lottery म्हाडाच्या ९३६ सदनिकांची सोडत जाहीर असा करा घरबसल्या ऑनलाईन अर्ज