मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मतदारसंघात सुट्टी जाहीर केली जाते. त्यानंतरही अनेकवेळा दुकाने सुरू ठेवल्याने त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. याची गंभीर दखल मुंबई महापालिकेने घेतली असून मतदानाच्या दिवशी दुकाने सुरू ठेवल्यास मालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पालिकेने नियंत्रण कक्ष सुरू केले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.
महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणुका होत आहेत. चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईत मतदान होणार आहे. मुंबईत मतदानाच्या दिवशी अनेक लोक पिकनिकला गेलेले असतात. तर शहरातील दुकानेही सुरू ठेवली जातात. मुंबईत मतदानाच्या दिवशी दुकाने सुरू असल्याने निवडणूक विभागाने सुट्टी जाहीर केली तरी त्या दुकानात काम करणाऱ्या कामगारांना या सुट्टीचा काहीही फायदा होत नाही. यामुळे २९ एप्रिल रोजी तत्काळ व अत्यावश्यक सेवा देणाऱया आस्थापना सोडून, आपली दुकाने व आस्थापना बंद ठेवावीत. जेणेकरून, सर्व कर्मचाऱयांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येईल. तसेच तत्काळ व अत्यावश्यक सेवा देणाऱया आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱयांना मतदानासाठी सवलत देण्यात यावी. अशी सवलत न दिल्यास संबंधित मालकाविरुद्ध निवडणूक कायदा अंतर्गत व इतर कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
याची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेने तक्रार निवारण कक्ष स्थापन केले आहेत. नियमांची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी तक्रार निवारण कक्षाकडे कराव्यात तसेच सर्व सुज्ञ मुंबईकर मतदारांनी निर्भयपणे आणि निष्पक्षपणे या निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
नियंत्रण कक्षाची माहिती - संपर्क क्रमांक