मुंबई- मुंबईमध्ये दरवर्षीं पावसाळ्यात दादर हिंदमाता आणि सायन गांधी मार्केट येथे पाणी साचते. गांधी मार्केट येथे साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिका १४ कोटी रुपये खर्च करणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने युद्धपातळीवर सुरू होईल. आणि येत्या पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. तर येत्या पावसाळ्यात पुन्हा गांधी मार्केट येथे पाणी साचल्यास पालिका आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांना त्याचा जाब विचारू असा इशारा विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिला आहे.
सायन भागातील पाण्याचा होणार निचरा; पालिका करणार १४ कोटी खर्च
मुंबईत मोठा पाऊस पडल्यावर पाणी साचते. साचलेले पाणी काढण्यासाठी पंप लावले जातात. मात्र, यावर यावर तोडगा काढणे गरजेचे होते. अनेक वर्ष या समस्येवर अभ्यास केल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वत: लक्ष घालून ही समस्या कायमस्वरूपी मिटविण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत.
कंत्राटदाराची नियुक्ती -
दरवर्षी थोडा पाऊस पडला तरी मुंबईत दादर हिंदमाता आणि सायन गांधी मार्केट येथे पाणी साचते. गांधी मार्केट येथे तीन ते चार फूट पाणी साचल्याने रस्ते वाहतूक बंद पडते. वेळप्रसंगी मुंबई ठप्प होते. गांधीमार्केटमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेला पंप बसवावे लागतात. हा पाण्याचा निचरा करण्यासाठी अनेक तास लागतात. समुद्राला भरती असल्यामुळे साचलेले पाणी समुद्रात सोडता येत नसल्याने ते शहरातच अडकून राहते. याचा परिणाम मुंबईकरांवर दरवर्षीं होतो. मुंबईकरांना दिलासा देता यावा यासाठी मुंबई महापालिकेकडून या विभागातील नाले आणि गटारांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. ९०० मिलीमीटर मृदपोलादी वाहिनी टाकून पाणी रेल्वेच्या नाल्यात सोडले जाणार आहे. तसेच पुढील चार वर्ष कंत्राटदाराला पंप लावून पाण्याचा निचरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या कामांसाठी साज इंटरप्राइझ या कंत्रादाराची नियुक्ती करण्यात आली असून त्यासाठी पालिका १४ कोटी रुपये खर्च करणार आहे.
आयुक्तांना जाब विचारणार -
याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडण्यात आला होता. मात्र, पाण्याचा निचरा किती वेळात होणार, काम करणा-या कंत्राटदाराला अनुभव किती आहे हे प्रस्तावात नमूद नसल्याने याबाबतचे स्थानिक नगसेवकांना या कामाबाबतचे सादरीकरण करावे, अशी मागणी नगरसेविका राजश्री शिरवडकर यांनी केली आहे. हे काम कसे केले जाणार आहे याची माहिती स्थानिक नगरसेविकेला दिलेली नाही. मी स्वत: तिथे राहत असलो तरी त्याची माहिती मलाही देण्यात आलेली नाही. महापालिकेने कंत्राटदाराचा खिसा भरण्याचे काम सुरु केले आहे. १४ कोटी खर्च करुनही जर पुन्हा पाणी साचले तर या गोष्टीचा पालिका आयुक्तांना जाब विचारणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिला.
मुंबईकरांना दिलासा मिळणार -
मुंबईत मोठा पाऊस पडल्यावर पाणी साचते. साचलेले पाणी काढण्यासाठी पंप लावले जातात. मात्र, यावर यावर तोडगा काढणे गरजेचे होते. अनेक वर्ष या समस्येवर अभ्यास केल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वत: लक्ष घालून ही समस्या कायमस्वरूपी मिटविण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हे काम झाल्यावर पाणी साचण्याचा त्रास कमी होणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.