महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई मनपाची शोधमोहीम; २९४३ ठिकाणी डेंग्यू, मलेरियाच्या आळ्या सापडल्या - Rajendra naringrekar mnc mumbai

मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. एकीकडे मुंबईत कोरोनाचे संकट वाढत असताना पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्यात मुंबईत डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळतात. यामुळे पावसाळयापूर्वी पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याची मोहीम राबवली जात आहे.

Mnc worker
पालिकेचे कर्मचारी शोधमोहीम राबवताना.

By

Published : May 31, 2020, 7:12 PM IST

मुंबई -कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. या परिस्थितीत पावसाळा तोंडावर आल्याने मुंबई महानगरपालिकेने डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांच्या उत्पत्ती स्थानाची शोध मोहीम सुरू केली आहे. १३ ते २८ मे दरम्यान राबवलेल्या या मोहिमेअंतर्गत डेंग्यूची २ हजार ३५१ ठिकाणी तर ५९२ ठिकाणी मलेरियाच्या अशा एकूण २ हजार ९४३ ठिकाणी अळ्या सापडल्याची माहिती पालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजेंद्र नारिंग्रेकर यांनी दिली. तर ही मोहीम पावसाळ्याच्या चार महिन्यांत सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकीकडे मुंबईत कोरोनाचे संकट वाढत असताना पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्यात मुंबईत डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळतात. यामुळे पावसाळयापूर्वी पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याची मोहीम राबवली जात आहे. १३ ते २८ मे या केवळ १६ दिवसांच्या कालावधीत तब्बल २ हजार ३५१ ठिकाणी 'एडिस एजिप्ती' या डेंग्यू प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्या, तर ५९२ ठिकाणी मलेरियावाहक 'ऍनॉफिलीस स्टिफेन्सी' डासांच्या अळ्या आढळल्या. यानंतर डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केल्याचे नारिंग्रेकर यांनी सांगितले.

२६ हजार ५८६ इमारती परिसर तर ३ लाख ५ हजार ८९७ झोपडपट्टी परिसरात कीटकनाशक औषधाची फवारणी केल्याचे त्यांनी सांगितले. कीटकनाशक औषधाचा २८ हजार किलो लिटर साठा सध्या पालिकेकडे उपलब्ध असून गोदामाची क्षमता संपल्याचे त्यांनी सांगितले.

अशी राबवली जातेय मोहीम -

कीटकनाशक खात्यातील १ हजार ५०० कामगार-कर्मचारी-अधिकारी हे लाॅकडाऊनच्या काळातही कार्यरत आहेत. यावर्षीच्या पावसाळा पूर्व तपासणी मोहिमेदरम्यान मुंबईच्या कानाकोपऱ्यातील विविध भागांचे आणि इमारतींच्या परिसरांचे सर्वेक्षण केले जात आहे. या तपासणीदरम्यान इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, झोपडपट्ट्यांमधील पाण्याचे पिंप, प्लास्टिक किंवा ताडपत्री मध्ये साचलेले पाणी, परिसरात पडून असले टायर व त्या टायरमध्ये साचलेले पाणी, झाडांच्या कुंड्यांखालील ताटल्या, शोभिवंत झाडांच्या कुंड्या, पाणी असणाऱ्या शोभेच्या वस्तू, नारळाच्या करवंट्या व त्यात साचलेले पाणी, फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यामधील किंवा बाटल्यांच्या झाकणांमधील पाणी इत्यादींची तपासणी करण्यात येत आहे. कोविड १९च्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण करताना मास्क वापरणे, हॅन्ड ग्लोव्हज वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे या गोष्टींची विशेष दक्षता घेत असल्याचे ते म्हणाले.

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी

घराशेजारील परिसरात असणारे टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्यांची झाकणे, पाण्याचे पिंप, मनी प्लांट - बांबू यासारख्या शोभेच्या झाडांसाठी ठेवण्यात येणारे पाणी, काचेची किंवा धातूची कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, कुंड्यांखालील ताटल्या, यासारख्या विविध वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचते. या पाण्यातही डास अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या निरुपयोगी वस्तू त्वरित नष्ट कराव्यात, असे आवाहन नारिंग्रेकर यांनी केला आहे.

मलेरिया प्रसारक अळ्यांचा शोध -
एकूण परिसराची पहाणी - ११,५२८ ठिकाणे
डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेतला - ३०,३३५
प्रत्यक्षात आळ्या सापडल्या - ५९२

डेंग्यू प्रसारक आळ्यांचा शोध -

एकूण परिसराची पाहणी - ३,६९,५६२
डासांच्या उत्पत्ती स्थानांचा शोध घेतला - ३,८७,६१०
प्रत्यक्षात आळ्या सापडल्या - २,३५१.

ABOUT THE AUTHOR

...view details