मुंबई - अंधेरी येथील गोखले पूल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर धोकादायक पुलांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये पश्चिम उपनगरातील ३ पूल तसेच दोन पादचारी पूल धोकादायक असल्याचा अहवाल सल्लागारांकडून देण्यात आला आहे. आता हे ५ पूल पाडून त्यांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासन ३९ कोटी १० लाख रुपये खर्च करणार आहे.
मुंबई महापालिकेकडून पश्चिम उपनगरातील पाच पुलांची पुनर्बांधणी, ४० कोटींचा खर्च - मुंबई पश्चिम उपनगरातील धोकादायक पूल
मुंबईमध्ये पूल कोसळण्याच्या घटनांमध्ये अनेक नागरिकांचे जीव गेले. त्यामुळे धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यानुसार आता मुंबई महापालिकेने पश्चिम उपनगरातील ५ पुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २४ महिन्यात या पुलांचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहे.
अंधेरी येथील गोखले पूल व सीएसएमटी येथील हिमालय पुलाचा भाग कोसळल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. स्टॅक कमिटीच्या निर्देशानुसार मुंबई शहर व उपनगरातील पुलांचे तांत्रिक सल्लागाराच्या माध्यमातून स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. या सल्लागाराने दिलेल्या अहवालानुसार, पाचही पूल धोकादायक असल्याचे समोर आले. गोरेगाव पूर्व येथील वालभट नाल्यावरील पूल, कांदिवली पश्चिम येथील एस. व्ही. पी. रोडवरील पूल, मालाड पश्चिम येथील टेलिफोन एक्सचेंज जवळील पूल, रामचंद्र नाल्यावरील पूल, कांदिवली पश्चिम येथील सरोजिनी नायडू मार्ग, विठ्ठल रुख्मिणी मंदिराजवळील पादचारी पूल व कांदिवली पूर्व येथील नवरंग रोड येथील आकुली रोडवरील पादचारी पूल, असे एकूण तीन वाहतूक पूल आणि दोन पादचारी पूल धोकादायक आहेत. त्यामुळे ते पाडण्यात येणार आहेत.
मुंबई तुंबल्याने १४ हजार कोटींचा फटका, श्वेतपत्रिका काढण्याची मागणी
मे. बुकान इंजिनीअर्स अँड इन्फ्रास्ट्क्चर प्रायव्हेट लिमिटेड हा कंत्राटदार नोंदणीकृत कंत्राटदार आहे. या कंपनीने यापूर्वीही महापालिकेची विविध कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे या कंत्राटदाराला या पाच पुलांच्या पुनर्बांधणीचे काम देण्यात येणार आहे. कामाचे आदेश देताच पावसाळा वगळता २४ महिन्यात पाचही पुलांचे काम पूर्ण करणे कंत्राटदाराला बंधनकारक करण्यात आले आहे.