मुंबई -गेल्या आठवड्यात दाणादाण उडवणाऱ्या मुसळधार पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे, रस्ते वाहतुकीवरही परिणाम होत आहे. रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी तसेच शाळांमध्ये मुंबई महापालिकेने 'निवारा गृह' सुरू केले आहेत. अतिवृष्टीमुळे मुंबई उपनगरात शाळा आणि प्रशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सीएसटी, दादर, कुर्ला रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी पालिकेने 'निवारा गृह' सुरू केले आहे. पालिकेने सीएसटी बोराबाजार येथील मोहनदास शाळा, दादर पश्चिम येथील भवानी शंकर रोड वरील गोखले रोड पालिका शाळा, तर कुर्ला पश्चिम येथील मोरेश्वर पाटणकर शाळा या ३ शाळांमध्ये 'निवारा गृह' सुरू केले आहे.
"अतिवृष्टी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आज सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवावीत. तसेच जे विद्यार्थी शाळेत आलेले असतील त्यांना सुखरूप पालकांच्या हाती देऊनच शाळा सोडावी. नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावे." असे आवाहनही जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यात आज (शनिवार) ३ ऑगस्ट २०१९ रोजीची सुट्टी जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले.